ONLINE

#ONLINE #cp

आज सकाळपासूनच मैथिली खूप अस्वस्थ होती. दर दहा-पंधरा मिनिटांनी इन्स्टाग्रामच्या पोस्ट्‌स चेक करत होती; पण ‘नो लाइक्‍स’! कुठली मैत्रीण केव्हा ऑनलाईन होती; हेही तिचं पाहून झालं होतं. शेवटी तिनं तो नाद सोडून दिला. बघता बघता सकाळचे दहा वाजले. पटापट आवरून ती ऑफिसला जायला निघाली. निघताना कुणाचा निरोप घेण्याचा प्रश्नच नव्हता. माईंच्या खोलीचं दार बंद होतं. बहुधा मालिका सुरू असावी आणि चिरंजीवांचं, म्हणजे अक्षयचं, तर काही विचारायलाच नको. सतत इंटरनेटवर किंवा हेडफोन लावून गाणी ऐकण्यात स्वारी मग्न. स्वतःची खोली सोडली तर बाकीच्या विश्वाशी त्याचा जणू काही संबंधच नव्हता. ‘ताई डबा...’ विमलच्या बोलण्यानं मैथिली भानावर आली आणि तिनं दिलेला डबा घेऊन बाहेर पडली. नाही म्हणायला विमल आहे ते बरं आहे; म्हणून तर आपल्याला निर्धास्तपणे घराबाहेर पडता येतं, असा विचार मैथिलीच्या मनात आला. सीटबेल्ट लावून तिनं गाडी सुरू केली. मनात विचार सुरूच होते. इतकी सुंदर पोस्ट...पण ‘नो लाइक्‍स’? तिनं मनोमन ठरवलं, आता येऊ दे एखादा मेसेज; मीपण नाही रिप्लाय करणार! असा विचार केल्यानंतर तिची अस्वस्थता थोडी कमी झाली.
मैथिलीचा दिवस नेहमीप्रमाणे धावपळीतच गेला. घरी यायला सात वाजले. विमलनं चहा दिल्यावर थोडं बरं वाटलं. माईंना जेवायला वाढून विमल गेली. थोड्या वेळानं मैथिलीनं अक्षयच्या खोलीचं दार वाजवलं ः ‘‘अक्षय, जेवायला येतोस ना?’’ ‘‘मॉम, यू कॅरी ऑन. मी जेवेन नंतर. डोंट डिस्टर्ब मी,’’ अक्षयनं दार न उघडताच सांगितलं. हे त्याचं नेहमीचंच होतं. कॉलेजला गेल्यापासून इंटरनेटचं त्याचं वेड फारच वाढलं होतं. शेवटी मैथिलीनं पटकन जेवून घेतलं. उद्याचा दिवस तिला दिसत होता...तिनं झोपताना एकदा मेसेजेस चेक केले. ठरवल्याप्रमाणे एकाही पोस्टला ‘लाइक’ न करता ती झोपली.
सहा वाजता गजर झाला; पण मैथिलीला उठावसंच वाटेना. डोकं जड वाटत होतं. अशक्तपणा जाणवत होता, थोडी कणकण होती अंगात. आज ऑफिसला जाता येईल, असं तिला वाटेना. तिनं बॉसला मेसेज केला आणि पडून राहिली. थोड्या वेळानं विमल आली. तिनं चहा-नाश्‍ता मैथिलीला आणि माईंना खोलीतच दिला. अक्षयराजे अजूनही गाढ झोपेतच होते. काल रात्री किती वाजेपर्यंत जागा होता कोण जाणे!
काही वेळानं अक्षय त्याच्या खोलीच्या बाहेर आला. ‘‘हाय मॉम...अजून तू घरीच? यू नो मॉम, काल इंडोनेशियात किती भयंकर भूकंप झाला, तेच बघत बसलो होतो...आणि त्यानंतर ट्रम्पचं भाषण! काय सॉल्लिड बोललाय तो! तुला काहीच कसं माहीत नाही?’’
अक्षय बोलतच राहिला.
‘‘अरे वेड्या, सगळ्या जगाची बित्तंबातमी आहे तुला आणि इथं घरात मला बरं वाटत नाहीए याची साधी कल्पना तरी आहे का तुला? अक्षयराजा, जरा डॉक्‍टरकाकांकडं जा...आणि माझ्यासाठी औषध आण बरं...’’ ‘‘ओ गॉड! ममा, तू डॉक्‍टरअंकलना मेसेज कर ना. त्यांनी गोळीचं नाव कळवलं की मेडिकलवाल्याला मेसेज कर. त्यांचा माणूस आणून देईल गोळी. सॉरी मॉम,’’ असं म्हणून स्वारी पळालीसुद्धा. देवपूजा आटोपून माई बाहेर आल्या.
‘‘मैथिली, बरं वाटत नाहीए का तुला? अगं, किती दगदग करतेस? नोकरी सोडून का देत नाहीस?’’
‘‘माई, औषध घेतलं की वाटेल मला बरं...आणि तसंही नोकरी सोडून काय करू?’’
‘‘तेही खरंच गं...श्रीरंग जाऊन बसलाय तिकडं यूएसमध्ये. तिथं तो एकटा आणि इथं तू एकटी. स्वतःला गुंतवून घेतलंयस तेच बरंय. आज मंगळवार ना गं? चिरंजीवांशी बोलायचा दिवस. थांब सांगतेच त्याला.’’
‘‘जाऊ द्या ना माई. मी तो विषयच सोडून दिलाय.’’
संध्याकाळचे सात वाजले आणि श्रीरंगचं स्काईपवरून बोलणं सुरू झालं. माई आल्या आणि म्हणाल्या ः ‘‘श्रीरंगा, अरे भारतात कधी येतोयस ते आधी सांग मला. इथं ही मैथिली एकटीनं तुझा संसार करतेय.’’ ‘‘अगं माई, पण पैसे पाठवतोय ना मी तिला?’’ ‘‘अरे, पैसा म्हणजे सर्वस्व नाही रे बाळा. सहवास-प्रेम-माया या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का, श्रीरंगा? माझ्या आयुष्याची ही संध्याकाळ आहे. आज आहे; पण उद्या असेनच याची हमी नाही. आता बीपी, डायबेटिस यांचीच सोबत आहे मला.’’
‘‘कम ऑन माई, तुला काहीही होणार नाही. अजून खूप जगायचंय तुला...आणि आपण बोलतो ना अधूनमधून?’’ ‘‘बोलतो रे...पण किती दिवसांत तुझा हात हातात नाही घेतला. तुझ्या डोक्‍यावरून हात नाही फिरवला. तुझ्या स्पर्शासाठी आसुसले आहे रे.’’ ‘‘ते सगळं जाऊ दे माई. अगं माई, उद्या तुझा वाढदिवस ना? त्यासाठी तुला गिफ्ट पाठवतोय. आवडलं का ते उद्या कळव.’’
दुसऱ्या दिवशी माईंचा वाढदिवस होता. विमलला त्यांच्या आवडीचा मेनू करायला सांगून मैथिली बाहेर पडली. थोड्याच वेळात कुरिअरवाल्यानं माईंसाठी श्रीरंगचं गिफ्ट आणून दिलं ः स्मार्ट फोन! माईंनी अक्षयला बोलावलं. तो म्हणाला ः ‘‘वॉव! आजी, तू पण आता स्मार्ट आजी होणार तर! मी शिकवतो तुला कसा वापरायचा हा फोन. मग तुझ्या मैत्रिणींशी व्हॉट्‌सॲपवर करत जा चॅट...’’

काही दिवसांतच माईही अक्षयच्या म्हणण्याप्रमाणे स्मार्ट झाल्या. त्यांच्या मैत्रिणीही स्मार्ट झालेल्या होत्याच. सगळ्यांनी व्हॉट्‌सॲपवर ग्रुप केला आणि ऑनलाईन राहून चॅट करू लागल्या. रोजची बीपीची गोळी विसरू नये म्हणून अक्षयनं त्यांना रिमाइंडर लावून दिला होता. घरी कधीतरी मैत्रिणी यायच्या; पण व्हॉट्‌सॲपमुळं तेही प्रमाण जवळजवळ नगण्यच झालं होतं. नातेवाईक, मैत्रिणी, बिल्डिंगमधल्या बायका सगळ्यांचंच चॅटिंग सुरू होतं, मग भेटायचं कशाला? सगळ्यांची आयुष्यं समांतर रेषेत सुरू होती. एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही; सगळेच आत्ममग्न!
श्रीरंगही कधी कधी माईंशी चॅट करत असे. ‘‘हॅलो, माई, तुला ऑनलाईन बघून खूप मस्त वाटतंय! तू आता खऱ्या अर्थानं माझी मॉम आणि अक्षयची ग्रॅंडमा शोभतेस हं! माई, ही गॅजेट्‌सची दुनियाच काही और आहे, हे तुझ्या लक्षात आलं असेलच! आणि माई, आता तू कोणतीही वस्तू, औषधं, अगदी साडीसुद्धा, ऑनलाईन मागवू शकतेस. आहेस कुठं! माई, आता तुला कसलीच चिंता नाही ना?’’
‘‘नाही कशी? अरे श्रीरंगा, प्रेम-माया-जिव्हाळा-आपुलकी या गोष्टी नाही ना रे मिळत ऑनलाईन! माणसाला जगण्यासाठी फक्त पैसा आणि त्यातून मिळणारी भौतिक सुखसाधनं पुरेशी नसतात रे. काही मौल्यवान गोष्टी कधीच विकत घेता येत नाहीत...कधी कळणार हे तुम्हाला?
‘‘अगं, माई हे एकविसावं शतक आहे. विज्ञानानं केवढा पल्ला गाठलाय. माई, तुझ्या लक्षात येतंय का, की हे स्मार्ट फोन्स, कॉम्प्युटर्स म्हणजे मानवी बुद्धीची कमाल आहे!’’
‘‘श्रीरंगा, मान्य आहे, या एकविसाव्या शतकात या सगळ्या गोष्टी असणारच; पण ही गॅजेट्‌स गरज म्हणून वापरणं आणि त्यांच्या आहारी जाणं यात फरक आहे ना रे? ही स्मीमारेषा ओळखूनच वागायला हवं. नेट का काय म्हणता तुम्ही...त्या जाळ्यात तुम्ही स्वतःच अडकत जाता. खरं की नाही?’’
‘‘ओ! माई, तू तुझा मुद्दा सोडणार नाहीस.’’
‘‘श्रीरंगा, माझं म्हणणं तुला आत्ता नाही पटलं तरी पटेल हळूहळू.’’
श्रीरंग आणि माई यांच्यात कधी स्काईपवरून, तर कधी फोनवरून असे संवाद अधूनमधून होत असत. असेच काही दिवस उलटले. आज सकाळपासूनच माईंना थोडं अस्वस्थ वाटत होतं; त्यामुळं त्या पडूनच होत्या. खरंतर कालच त्यांचं ग्रुपवर ‘उद्या ट्रिपचं ठरवायचं,’ असं ठरलं होतं; पण आज त्यांचं नेट ऑफच होतं. मोबाईल चार्जिंगलाही लावलेला नव्हता. मैथिली ऑफिसला निघाली तेव्हा माईंच्या खोलीचं दार बंदच होतं. तिला वाटलं, नेहमीप्रमाणे मालिका बघत असतील. आज सकाळीच अक्षयही कॉलेजला गेला होता. विमलनं माईंना जेवायला वाढलं; पण त्यांना फारसं जेवण गेलंच नाही. लॅच लावून विमल भाजी आणायला बाहेर पडली.
इकडं मैथिलीला माईंच्या मैत्रिणीचा मेसेज आला ः ‘अगं, आज माई ऑनलाईन का नाहीत? किती मेसेजेस केले; पण त्यांनी पाहिलेच नाहीत. फोनही लागत नाहीए त्यांचा. बऱ्या आहेत ना त्या?’
मैथिलीला काळजी वाटली. तिनंही फोन करून पाहिला; पण लागला नाही. ती ऑफिसमध्ये सांगून घरी आली तर माई निपचित पडलेल्या होत्या. तिनं लगेच डॉक्‍टरना बोलावलं. डॉक्‍टर म्हणाले ः ‘‘माई गेल्या आहेत...हृदयविकाराचा तीव्र झटका.’’
‘‘काय?’ मैथिली उडालीच.र्‌ ल चार्जिंगला न लावल्यानं रिमाइंडर वाजलाच नव्हता
आणि कालपासून बीपीच्या गोळ्या घेतल्याच गेल्या नव्हत्या. मैथिलीचे डोळे पाणावले. तिनं श्रीरंगला कळवलं.
‘‘काय? माई गेली?’’ श्रीरंग एकदम खचलाच. माईचा प्रेमळ स्पर्श त्याला आता कधीच अनुभवता येणार नव्हता.
मैथिलीनं भराभर सगळ्यांना फोन केले. माईंच्या मैत्रिणी भेटून गेल्या. बाकी बऱ्याच जणांचे मेसेजेस आले ः RIP.
भेटायला यायला वेळ होता कुणाला? श्रीरंगला लगेच यूएसहून येणं शक्‍यच नव्हतं. आज माईंचे विचार त्याला आठवले आणि वाटलं...खरंच, किती विचित्र झालंय आयुष्य! कुणाचाच कुणाशी संबंध नाही. सगळ्यांनी एकमेकांना फक्त पैसा पुरवायचा, टीव्ही, मोबाईल अशी साधनं पुरवायची आणि त्यांच्या आधारावरच जगत राहायचं...कोरडं, वखवखलेलं जीणं...मेसेजेस आणि लाइक्‍सवर आधारलेलं...जिथं मायेचा स्पर्श नाही की आपुलकीची जाणीव नाही. वास्तवापासून दूर जाणाऱ्या
ऑनलाईन-ऑफलाईनच्या या आभासी जगात माणसाच्या मनाचं काय? भौतिक साधनांतून सुख मिळालं तरी समाधान मिळत नाही, त्यासाठी हवा असतो जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद, आपुलकीचा, ममत्वाचा स्पर्श, ज्यातून जगण्यासाठीचं बळ मिळतं. माईचं म्हणणं आज श्रीरंगला पटलं होतं; पण आता खूप उशीर झाला होता.
एक आयुष्यच कायमचं ऑफलाईन झालं होतं...

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .