मुलींना 'बाई' करण्याची घाई

राधिका ताई च्या फॅशन च्या विषयावरून शुभा प्रभू साठम यांचा लोकमत सखी मधील लेख शेअर करतेय...
खरंच गरज असते का अश्या फॅशनची...
आपणच नकळत काय करतो याची जाणीव पण होत नाही...

मुलींना 'बाई' करण्याची घाई
लग्नसमारंभ, सोहळे, पार्ट्या पाहा... त्यात लहान मुलींना त्यांच्या आया कसे कपडे घालतात?? जरतारी, उठावदार, शरीराचे आकार-उकार सांगणारे, उघड्या पाठीपोटाचे, कधी तंग, कधी झिरझिरीत कपडे. आणि हायहिल्स. अगदी पाच-सहा वर्षांची ठकीपण लिपस्टिक लावून हायहिल्स घालून ठुमकत असते. हे ठुमकणं बालसुलभ नसून स्त्री सुलभ असतं. मॉडर्न कपडे घालण्याच्या नावाखाली त्या वयात बिनधास्त खेळण्याचं मुलींचं स्वातंत्र्य आपण का हिरावून घेतो?

- शुभा प्रभू-साटम
एक असाच घरगुती समारंभ..
अनेकदा अशा ठिकाणी मी त्रयस्थ निरीक्षकाच्या भूमिकेत असते. खूप नव्या गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे मला माणसं पहायला आवडतात. सामील न होता उत्सुक अलिप्ततेने मी माणसांचं वागणं, लकबी, तºहा टिपत असते. (अर्थात यात टीकेचा भाग मुळीच नसतो हे आधीच स्पष्ट करतेय.) इतक्या नव्या नव्या गोष्टी कळतात. इंग्रजीत एक म्हण आहे, मुखपृष्ठावरून पुस्तकाला जोखू नका ती इथं चपखल बसते. तर या सोहळ्यात माझं हे निरीक्षण यथासांग चालू होतं; पण मला सतत काहीतरी खटकत होतं. उणीव भासत होती; पण नक्की कळत नव्हतं काय ते..
समारंभ आटोपला, मी जायला निघाले तशा कंपाउण्डमध्ये दोन चिटुकल्या छोट्या खेळत होत्या. केसांचं घरटं, चेहरे घामेजलेले, हौशीनं माळलेले गजरे गळ्यात आलेले; पण उत्साह ओतप्रोत. मस्त तब्येतीत खेळ चालला होता. ते पाहून लखकन प्रकाश पडला की हेच मी आधी मिस करत होते. हॉलमध्ये समारंभावेळी मुलांचा जो अपेक्षित धिंगाणा असतो तो चालू होता; पण तिथं खेळणारे फक्त मुलगेच दिसत होते. मुली नव्हत्याच. म्हणजे समारंभात होत्या, त्या खेळण्यात नव्हत्या. त्या आयांसोबत किंवा कोपऱ्यात घोळक्यानं उभ्या होत्या. आपले भरजरी कपडे, केसांची स्टाइल सांभाळत फोटो काढत होत्या. वय वर्षे साधारण ५ ते १३ वर्षे वयाच्या या मुली. या मुली उन्मुक्त खेळताना सोडा, बिनधास्त वागतानाही दिसल्या नाहीत.
या मुली वयानं लहान; पण त्यांच्या लहान शरीरात तरुण मुलींची मानसिकता दिसत होती. आपलं दिसणं, कपडे केस, मेकअप याबद्दल प्रचंड जागरूक असलेल्या मुली. त्यांना इंग्रजीत ‘यंग अ‍ॅडल्ट’ म्हणतात. अकाली प्रौढ. पण हे प्रौढत्व विचारांचं नव्हतं तर फक्त दिखाव्याचं होतं.
जवळपास सर्व समारंभ, लग्न, सोहळे, पार्ट्या पहा मोठ्या बायका किंवा मुलींसारखी वेशभूषा केलेल्या लहान मुली सगळीकडे सर्रास दिसतात. जरतारी उठावदार कपडे, मेकअप, दागिने आणि हो चपलापण ! शरीराचे आकार-उकार सांगणारे, उघड्या पाठीपोटाचे, कधी तंग, कधी झिरझिरीत. फरक फक्त शारीरिक वयाचा; पण अगदी पाच-सहा वर्षांची ठकीपण लिपस्टिक लावून हायहिल्स घालून ठुमकत असते. हे ठुमकणं बालतुलम नसून स्त्री सुलभ असतं.
आता हा बदल कधी आला? कशामुळे आला? कुणात झाला? याचा ऊहापोह करायचा तर जागा अपुरी पडेल; पण असं झालंय खरं. लहान मुलीचे पोशाख/कपडे हे मोठ्या/तरुण स्त्रियांसारखेच होऊ लागलेत. तसेच घोळदार घागरे, नेट, लेस, आरसे, ओढण्या, मोठाले लोंबते कानातले, केसांचे वेगवेगळे हेअरडू किंवा स्टाइल आणि या सर्वाला साजेल अशा चपला. उंच टाचांच्या. या तºहेने सजवलेल्या या भावल्या आपल्या आईबाबांसोबत सर्रास दिसतात.
आपल्याला बार्बी माहीत आहे. लहान मुलीची ही बाहुली. लहान मुलगी सारखं दिसायचं सोडून बाकी सर्व दिसते. वळणदार अवयव, त्याला उठाव देणारे कपडे आणि तद्दन खोटा असा कमनीय बांधा. थोडक्यात मदनिका. फार वर्षांपूर्वी आपल्याकडे बाहुल्या असायच्या. लाकडी ठक्या अथवा गोबºया गालाच्या गबदूल अशा बाहुल्या. बार्बीनं त्यांना पार अडगळीत टाकलेय. अर्थात या बार्बीवर नंतर प्रचंड टीकेची झोड उठली. तिच्यात फरकही झाले; पण तोपर्यंत डॅमेज वॉज डन. जे आपण हल्ली लहान मुलींच्या पोशाखात पाहतोय. फक्त पोशाख नाही तर केस, मेकअप, चपला, पर्स सगळ्याच बाबतीत हा बदल दिसतोय. लहान मुलींचीही मादी करण्याचा हा अट्टहास सर्रास दिसतोय.
प्रश्न येतो की असं का?
एक मुख्य कारण म्हणजे प्रचंड फोफावलेला सोशल मीडिया. ज्यामुळे जगातले सर्व ट्रेण्ड सगळीकडे पसरतात आणि फोफावतात. हा मीडिया दुधारी तलवार आहे आणि त्याचा वापर नकारात्मक रितीने होतोय. त्यातही एक बाई आणि एक आई म्हणून मुलींची मादी करण्याचा हा जो ट्रेण्ड आहे तो मला फार अस्वस्थ करतोय. देशाच्या घटनेने नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य दिलेय आणि त्यानुसार पोशाखाचं स्वातंत्र्य आहे हे मला मान्यच आहे. मात्र फोल पोशाखी स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असं मानण्याचा दुर्दैवी प्रकारही समाजात रुजलाय.
सर्वात वाईट म्हणजे प्रामुख्यानं ग्रामीण आणि पर्यायानं निम आणि उच्च मध्यमवर्गीय घरात रुजलाय. माणसाला आपल्यापेक्षा वरचढ गोष्टींचं अप्रूप नेहमीच वाटतं. त्याचं अनुकरणपण केलं जातं. आमीरची दाढी, सैफचा चष्मा, रणवीर सिंहचे कोट लगेच फॅशनमध्ये येतात. दीपिकाचे ब्लाऊज, कंगनाच्या साड्या, प्रियंकाचे घागरे, आलियाचे शर्टपण लोकप्रिय होतात. त्यात बिलकुल गैर नाही. पण अशा फॅशन जेव्हा लहान मुलांवर आणि त्यात मुलींवर येतात तेव्हा ते नक्कीच हेल्दी - निरोगी नसते.
आधीच आपल्याकडे बाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक आहे... तिच्या बाबतीतील सर्व गुन्हे विशेषत: बलात्कार, छेडछाड याला तिचा पोशाख किंवा वागणं याला जबाबदार धरणं आताशा सामान्य झालंय. तोही धादांत आचरटपणाच आहे. बाईच्या कपड्यांना सर्रास दोष दिला जातो, ज्यात खरं तर काहीच तत्थ्य नाही. आणि दुसरीकडे त्याच समाजात अगदी लहान मुलीला ‘उठावदार’ कपडे घालून तिचे पालक काय साधतात? एखादी पाच वर्षाची गोबरी छोटी जेव्हा टाचका मिनी आणि केसांचा बॉब सावरत हायहिल्स घालून, लिपस्टिक लावलेल्या ओठांनी मावशी म्हणून गळ्यात पडते तेव्हा मला तिच्या पालकांना बदकावून काढावेसे वाटते.
विचारावंसं वाटतं की, या निरागस मुलीला
बाई करायचा हा सोस का?
तुमचे विचार जुनाट, पारंपरिक मग हे निव्वळ पोशाखी स्वातंत्र्य मुलीचं बालपण झाकोळून टाकणार नाही का? नटणं-मुरडणं-छान दिसणं किंवा लोकांनी कौतुक करावं असं वाटणं यात काहीही गैर नाही; पण ते वयानुसार झालं पाहिजे. पण आता स्विमिंग टॅँकवर पाहा. मोठ्या बाईच्या वापरायच्या बिकिनी लहान मुलींना सर्रास घातलेल्या दिसतात. तेच चपलांच्या बाबतीत. मोठ्या बायकांनी त्यांना आवडेल ते काहीही घालावं, खडावा का घालेनात, काहीही फरक पडत नाही; पण लहान कोवळ्या मुली या मैलभर उंच टाचाच्या सॅडल्स घालून डुगडुगतात, तेव्हा वाईट वाटतं.
गंमत म्हणजे हे सगळं हौस या नावाखाली खपवलं जातं. अनेकदा तर आईची हौस. मात्र आपल्या हौशीखातर आपण त्या मुलीचं लहानपण, तिचं खेळण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतो, त्याचं काही नाही. बरं लहानपणापासून असेच कपडे घालणारी छोटी जेव्हा तरुण होते तेव्हा हेच पालक, हीच आई लगेच सजग होऊन सांगायला तत्पर की, ओढणी घे. केवढा मोठा गळा, किती छोटा शर्ट जरा बाईसारखी वाग. इतके दिवस हौशी मॉडर्न असलेले पालक एकाएकी संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत शिरतात.
हे सारं काय आहे? माझ्या मते हे सारं मुलीला ‘मादी करणं’ या प्रकारात मोडतं. मादी म्हटली की तिचं भागधेय फक्त पुनरुत्पादन. आणि कळत-नकळत अजाणतेपणी, आपणच या माद्या बनवण्याचे कारखाने आपल्या घरात सुरू करतो. इथं एक लक्षात ठेवायला हवं की जसे पालक तशी मुलं. तुम्ही जशा सवयी लावता जसं वागता त्याचंच अनुकरण मुलं करतात.
इथे आणखी एक गोष्ट परत स्पष्ट करतेय की मला अशा उत्तान पोशाखाला मुळीच दोष द्यायचा नाहीये, ती वैयक्तिक आवड आहे. आक्षेप आहे तो लहान मुलींना या पोशाखात जखडून त्यांना अवेळी तरुण करण्याच्या मानसिकतेला. ज्यामुळे मुलीचं निरागसपण हरवतंच; पण फक्त असे कपडे घालणं म्हणजे स्वातंत्र्य अशी चमत्कारिक सांगड त्यांच्या मनात बसते. एक लक्षात ठेवायला हवं की कपडे, सौंदर्यप्रसाधनं, लोशन, क्रीम, हेअरडाय, चपला, बुट, पर्सेस यांची एक महाकाय इंडस्ट्री आहे. तिला आपली उत्पादनं जास्तीत जास्त खपवायची आहेत. त्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे जाहिरातीमधून ग्राहकाला भुरळ पाडली जाते, ज्याला खतपाणी मग चित्रपट, सोशल मीडिया यातून व्यवस्थित मिळतं. दीपिकासारखा मखमली ब्लाऊज जर शिवला नाही किंवा प्रियंकासारखे केस रंगवले नाहीत तर आपण गावंढळ ठरू याची भीती वाटू लागते. त्या जाळ्यात आपण अलगद अडकतो ज्याची सुरुवात खरं तर आपणच अजाणतेपणी आपल्याच घरातून केलेली असते.

खरा प्रभाव कशात असतो?
विचारात, शिक्षणात, वागण्यात, कर्तृत्वात जेव्हा हे सगळं असतं तेव्हा ही कृत्रिम पोशाखी कुबडी मुलींना कधीही लागत नाही. लागणारच नाही. म्हणून मुलींना या पोशाखी माद्या न करता त्यांना छोेट्या मुलीच राहू द्या. अल्लड, खेळकर, घामट, मस्तीखोर, द्वाड, व्रात्य. वयाला साजेसे वागू द्या. लहानपणापासून या आभासी स्वातंत्र्यापासून त्यांना मुक्त करा. उद्याच्या सक्षम बाईसाठी..!
.. आणि हो यात पोरगेपण येतात, त्यांच्याविषयी परत कधीतरी !

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाऱ्या लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com)u

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .