म्युच्युअल फंड गुंतवणुकीची सप्तपदी

म्युच्युअल फंड गुंतवणुकीची सप्तपदी                                                                                                                                                                             म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे लक्षात आल्यामुळे मोठ्या शहरांबरोबरच छोटी शहरे आणि गावांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारदेखील हळूहळू या प्रवाहात सामील होताना दिसत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे; मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदाराने पुढे दिलेल्या सात मुद्‌द्‌यांचा विचार केला पाहिजे, असे वाटते.

१) पहिले पाऊल म्हणजे आपल्या एकूण गुंतवणुकीतील काही हिस्सा म्युच्युअल फंडात गुंतवा आणि वेगवेगळ्या पर्यायातील (ॲसेट क्‍लास) गुंतवणुकीचा आपला समतोल कायम सांभाळा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही कमी-अधिक प्रमाणात जोखीमयुक्त असते. त्यामुळे जी रक्कम आपण किमान तीन ते पाच वर्षे किंवा आणखी अधिक कालावधीसाठी गुंतवू शकतो, अशीच रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा.

२) अधिक फंड (संख्या) म्हणजे अधिक परतावा नव्हे, हे लक्षात ठेवून दुसरे पाऊल टाका. एकसारख्या अनेक फंडात गुंतवणूक केल्याने फायद्याची शक्‍यता वाढत नाही; शिवाय अनेक फंड सांभाळणे, त्याचा आढावा घेणे जिकीरीचे होऊ शकते. एका व्यक्तीसाठी वेगवेगळ्या संकल्पनेचे तीन-चार फंड पुरेसे ठरतात.

३) इक्विटी फंडातील गुंतवणूक एक वर्षाआधी न विकण्याचा निर्णय घेऊन गुंतवणुकीचे तिसरे पाऊल टाका. कारण सध्याच्या प्राप्तिकर नियमांनुसार खरेदीपासून एक वर्षाआधी इक्विटी फंडाची विक्री केल्यास झालेल्या फायद्यावर पंधरा टक्के अल्पकालीन भांडवली कर द्यावा लागतो. निदान अशा वेळी प्राप्तिकर वजा जाता किती फायदा राहतो, याचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.

४) चौथे पाऊल म्हणजे केवळ लाभांश मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नका. कारण फंडावरील लाभांश हा कायम दर्शनी मूल्यावर (सध्या दहा रुपये) असतो. उदाहरणार्थ, शंभर रुपये एनएव्ही असलेल्या फंडाने वीस टक्के लाभांश जाहीर केला, तर तो दर्शनी मूल्यावर म्हणजेच दहा रुपयांच्या वीस टक्के अर्थात दोन रुपये मिळतो. गुंतवणूकदाराने शंभर रुपये ‘एनएव्ही’ला खरेदी केली असल्यास त्याला लाभांशाचा परतावा फक्त दोन टक्के मिळतो.

५) गुंतवणुकीसाठी फंडाची निवड करताना त्या फंडाचे व्यवस्थापन खर्चदेखील विचारात घेऊन पाचवे पाऊल टाका. एकाच प्रकारे गुंतवणूक करणाऱ्या दोन फंडांपैकी कमी खर्च असलेला फंड अधिक चांगला परतावा देतो. तसेच दोन फंडांची तुलना करताना सहा महिने किंवा एक वर्षातील कामगिरी न पाहता दीर्घकाळातील म्हणजेच पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळातील कामगिरी पाहा.

६) कमी एनएव्ही असलेला फंड स्वस्त असतो, असे समजून त्यात गुंतवणूक करण्याआधी त्याच्या परताव्याची आतापर्यंतची कामगिरी पाहून सहावे पाऊल टाका. त्यापेक्षा अधिक एनएव्ही असलेला फंड चांगला परतावा देत असल्यास गुंतवणुकीस योग्य ठरतो.

७) म्युच्युअल फंड कंपनीचे नाव आणि गुंतवणूक यांचा काहीही संबंध नसतो, हे लक्षात ठेवून सातवे पाऊल टाका. कारण (उदाहरणार्थ) रिलायन्स बॅंकिंग फंडाची गुंतवणूक ‘रिलायन्स’च्या शेअरमध्ये होत नसते, तर बॅंकांच्या शेअरमध्ये होत असते. तसेच सरकारी बॅंकेचे नाव असलेली म्युच्युअल फंड चांगली आणि एखाद्या खासगी कंपनीचे नाव असलेली कंपनी धोकादायक, असे काहीही नसते. दोन्ही कंपन्यांच्या इक्विटी फंड योजना असतील, तर त्या दोन्ही कंपन्या शेअर बाजारातच गुंतवणूक करीत असतात आणि दोघांनाही जोखीम सारखीच असते. म्हणूनच म्युच्युअल फंड कंपनीचे नाव पाहण्याऐवजी संबंधित फंडाची संकल्पना लक्षात घ्या.

वरील सात पावले योग्य प्रकारे टाकल्यास म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीची वाट बऱ्याच अंशी सुकर होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story