प्रसुती - सिझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा

प्रसुती - सिझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा
==================================
सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो.
कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास पहिला प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल?
सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की, आता तर काय सिझर नॉर्मल झालेत!
पण खरंच हे सिझेरिअन करणं म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटावर आणि गर्भाशयावर छेद घेऊन बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया इतकी सर्रास करण्यासारखी गोष्ट आहे का?
या शस्त्रक्रियेचा प्रचार साधारण: 6-7 वर्षापूर्वी प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर झाला. आज मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि बेजबाबदारपणो ही शस्त्रक्रिया जगभर केली जात आहे.
खरंतर गरोदरपण आणि प्रसूती या स्त्रीच्या आयुष्यात घडणारया नैसर्गिक घटना आहेत. गरोदरपण आणि प्रसूती हे काही आजार नाहीत. शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या समन्वयापासून ते अडीच-तीन किलोचा पूर्ण वाढ झालेला हाडांमासांचा जीव तयार होण्याची ही प्रक्रिया आणि त्या बाळाचा योनी मार्गातून बाहेर पडण्याचा पहिला प्रवास या दोन्ही गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट प्रक्रिया असल्या तरी त्या अतिशय सहज आणि सोप्या आहेत.

त्यामुळेच, शंभर गरोदर स्त्रियांपैकी पंचाण्णव स्त्रियांची प्रसूती ही नैसर्गिकरीत्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कोणाच्याही मदतीशिवाय होत असते. फक्त 5 टक्के स्त्रियांची प्रसूती ही अवघड असते; या पाचपैकी 4 टक्के स्त्रियांना प्रशिक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीची गरज भासते. फक्त 1 टक्का स्त्रियांची प्रसूती नैसर्गिकरीत्या होणं अशक्य असतं. अशा स्त्रियांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचविण्यासाठी सिझेरिअन शस्त्रक्रियेची गरज भासते. प्रत्यक्षात आज काय परिस्थिती आहे?

आज मोठय़ा शहरांमध्ये 50 टक्यांपेक्षा जास्त प्रसुती सिझेरिअन शस्त्रक्रियेद्वारा केल्या जातात. तालुक्याच्या ठिकाणी हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही ठिकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्केवारी वाढते आहे की काही वर्षानंतर नैसर्गिक प्रसूती ही वर्तमान पत्रातील चार कलमी ठळक बातमी ठरावी किंवा वैद्यकीय विद्यार्थींना शिकविण्यासाठी तयार केलेला दुर्मीळ व्हिडीओ म्हणून त्याचा विचार व्हावा.

अगदी साधी गोष्ट आहे. सिझेरिअन शस्त्रक्रियेचे बिल नैसर्गिक प्रसूतीच्या बिला पेक्षा किमान पाच ते दहा पटींनी जास्त असते. आज पैसा कुणाला नको आहे? नैसर्गिक प्रसूतीसाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांना वाट पहावी लागते; स्त्रीला कळा सोसाव्या लागतात; डॉक्टरांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्याचे निरीक्षण करावे लागते, ते नोंदवून ठेवावे लागते. एवढे करूनही आई किंवा बाळाच्या बाबतीत जर चुकून काही अपघात झालाच, तर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटल वर दगडफेक, वर्तमानपत्रात बदनामीकारक बातमी, वर्षानुवर्षे ग्राहक कोर्टात आणि फौजदारी कोर्टात चालणारे खटले हे शुक्लकाष्ठ मागे लागते.

या उलट सिझर करणं अतिशय सोपं. बधिरीकरण (भूल) शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा परंतु परिणामकारक प्रतिजैविकांमुळे, भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे, रक्तपेढय़ांच्या जाळ्यामुळे सिझेरिअन शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी आणि निर्धोक झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे.
त्यामुळे ना डॉक्टरांची रिस्क घेण्याची तयारी आहे ना, पालकांची!

मात्र नैसर्गिक प्रसूतीचे रूपांतर सिझेरिअनमध्ये करण्याचा डॉक्टरांचा निर्णय 90 टक्के वेळा चुकीच्या गृहितकावर आधारलेला असतो. बाळाच्या आणि आईच्या जिवाची भीती घातली, की आधीच धास्तावलेले नातेवाइक लगेचच ऑपरेशनला परवानगी देतील, अशी डॉक्टरांना खात्री असते. कळांनी अर्धमेली झालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे घेऊन जाणार? आणि अशी ऐनवेळी आलेली पेशंट प्रसूतीसाठी घेण्याची पद्धत आजकाल शहरात काय, पण खेडय़ात सुद्धा नाही.

प्रसूतीसाठी सिझेरिअनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याविषयी आज जगभर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. तथापि, नैसर्गिक प्रसूतीचे सिझरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित स्त्रीच्या बाळंतपणात काळजी घेणारया डॉक्टरांचा आणि ऐनवेळी घेतला जाणारा निर्णय असल्याने आणि हा निर्णय आई आणि बाळाचे प्राण वाचविण्या साठी घेतला जात असल्याने कोणत्याही पातळीवर या निर्णयाला आव्हान देणं अशक्य आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझरचे ऑडिट करण्याचा प्रस्तावही मध्यंतरी विचाराधीन होता; पण संबंधित डॉक्टरांच्याच विरोधाने तो बारगळला.

नैसर्गिक प्रसूतीची वाट पाहणारे, सिझेरिअनचा पर्याय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे डॉक्टर्स आज खूप कमी आहेत हे वास्तव आहेत.
वाट पाहणे, ही प्रसूतीशास्त्रतील एक सुंदर कला आहे. इंग्रजीत तिला Masterly Inactivity असं नाव आहे. जरूर ती सर्व काळजी घेऊन, जरूर ती सर्व निरीक्षणं नोंदवून आणि जरूर त्या सर्व तपासण्या करून, नंतर निसर्गाला आपलं काम करू देण्यासाठी शांतपणे वाट पहायची. ही कला आत्मसात करणं वाटतं तितकं सोपं जरी नसलं तरी फार अवघड आणि अशक्यही नाही. अतिशय अवघड परिस्थितीत, सर्व अडथळ्यांवर मात करून, नैसर्गिक प्रसूती करण्यात जो आनंद आणि समाधान डॉक्टर आणि पेशंटला मिळतं ते सिझेरिअन करून मिळणारा पैसा आणि समाधाना पेक्षा खुप उच्च प्रतीचं असतं, हे मी गेल्या पस्तीस वर्षात खूपदा अनुभवलेलं आहे.

सिझेरिअन करण्याआधी किती वाट पहावी, याबाबतचा इ.स. 1500सालातील एक किस्सा शेवटी सांगतो. ही घटना स्वित्झर्रलंड मधील आहे. त्या काळी सिझेरिअन शस्त्रक्रिया जिवंत स्त्रीवर करण्यास कायद्याने बंदी होती. गरोदर स्त्रीचा अकस्मात इतर काही कारणाने अपघाती मृत्यू ओढवला, तर बाळाला वाचविण्यासाठी मयत स्त्रीचे पोट कापून बाळ बाहेर काढले जाई. जेकॉब न्यूफर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीचे सिझेरिअन ऑपरेशन करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडे मागितली. सदर स्त्री सहा दिवस प्रसूतीच्या कळा देत होती आणि तेरा परिचारिकांनी तिची प्रसूती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सहा दिवस वाट पाहूनही प्रसूती होईना, म्हणून अखेर सिझेरिअन ऑपरेशनची परवानगी प्रचंड वादावादी नंतर देण्यात आली. ऑपरेशननंतर बाळबाळंतीण सुखरूप असल्याची दुर्मीळ घटना घडली. त्या स्त्रीने नंतर पाच मुलांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला. त्यातील एक जुळे होते. सिझेरिअनने जन्माला आलेली मुलगी पुढे 77 वर्षे जगली आणि भरपूर म्हातारी होऊन मेली.
तुम्ही न्यूपर इतकी वाट पाहू नका, पण थोडी तरी वाट पहायला काय हरकत आहे?

सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं.
१.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत.
-सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही.

२.गर्भाशयातील पाणी कमी झालंय.
-गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर 24 तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही.

३.बाळानं पोटात शी केली.
-प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी शी होणे, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणे विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी शी गिळली, तरीही त्याला या शी पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही शी बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात शी केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं.

४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत.
-गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माझ्याकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असते. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे.

डॉ. अशोक माईणकर
(लेखक सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात कामाचा त्यांना 35 वर्षाहून अधिक अनुभव आहे.)
एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी..!

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story