डोंगराएवढा
*🙏💢🙏💢🙏💢🙏💢🙏*
*डोंगराएवढा..! *
*- डॉ. अशोक माळी*
*🙏💢🙏💢🙏💢🙏💢🙏*
*मिरज तालुक्यातील मालगावात क्लिनिक चालवत असतानाची दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट.*
*‘डॉक्टर, पेशेंट बघाय येता ? ‘*
*चाळिशीतला माणसानं विचारलं.*
*‘कुठं ? ‘ माझा प्रतिप्रश्न.*
*त्यानं बोट दाखवलं, ‘ त्या डोंगरात... बायको आजारी हाय. दोन दिवस लई ताप हाय.‘‘*
*‘इकडेच आणायचं नाही का ?‘ मी.*
*‘कंडीशन नाही. अपंग हाय ती.‘*
*‘ठीक; एवढा पेशंट तपासू अन् निघू.‘‘ मी म्हणालो.*
*थोड्या वेळात डोंगराच्या रस्त्याला लागलो. काट्याकुट्यांतून, खड्ड्यांमधून पायथ्याशी पोहोचलो. छोटसं घर होतं. गाडी थांबताच तो घरात गेला. मी चिंचेच्या झाडाखाली उभा राहिलो. तो केवळ डोंगर होता. जवळपास एकही घर नव्हतं. घरापुढं दोन-तीन गुरं, तेवढंच जीवंतपणाचं अस्तित्त्व.*
*‘‘डॉक्टर, आत येता नव्हं?‘‘ त्याच्या आवाजासोबतच मी घरात गेलो. एका खाटावर त्याची बायको बसलेली. अंग झाकता येईल इतकेच कपडे. मला बघताच ती हरखली. खुणेनंच तिनं नवऱ्याला विचारलं, ‘कोण हाय?‘*
*तो म्हणाला, ‘डॉक्टर हायेत.... तुला तपासायला आलेत.‘‘ हे ऐकताच ती त्याचे दोन्ही दंड दाबून रडायला लागली.*
*‘काय झालं?‘ मी विचारलं.*
*‘‘तुम्ही इंजेक्शन द्याल म्हणून घाबरलीय.‘‘ तो बोलला.*
*मी तिला विश्वासात घेतलं, तपासलं. ‘‘फारसं काही नाही. सर्दी ताप आहे. दोन चार दिवसांच्या औषधानं बरं होईल.‘‘ मी धीर दिला.*
*बाहेर येऊन पुन्हा झाडाखाली थांबलो. ‘‘यांना काय झालं होतं? अपंग कशा? ‘‘*
*‘‘शिडीवरून पडली आणि मेंदूला मार लागला.‘‘ तो.*
*‘‘ किती वर्षं झाली? ‘‘ मी.*
*‘‘बारा...लग्नानंतर दोनच वर्षांत...‘‘ तो.*
*‘मग यांची सगळी कामं कोण करतं? सेवा शुश्रूषा...‘ मी.*
*‘मीच. अंघोळ, कपडे बदलणं, कपडे धुणं, स्वयंपाक सारं मीच करतो.‘‘ त्यांनी जगणं मांडलं.*
*‘‘यांना तर हर घटका माणसांची गरज पडत असणार. मग तुम्ही गाव सोडून इथं दूर डोंगरात का राहता?‘‘*
*‘‘ती मोठी गोष्ट हाय. हीचं असं झाल्यावर गावातले लोक दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागं लागले. रोज एक स्थळ आणू लागले. मी लग्न करणार नाही असं सगळ्याना सांगून दमलो. कुणी ऐकतच नव्हतं. सरळ इथं येऊन राहिलो.‘‘ तो हसला; म्हणाला, ‘‘पुन्हा स्थळ घेऊन कुणी आलंच नाही.‘‘*
*क्षणभर गेला. विचारावं की नको म्हणत मी एक प्रश्न विचारलाच.*
*‘‘खरंच एवढ्या वर्षांत तुम्हांला एकदाही दुसरं लग्न करावं वाटलं नाही?‘‘*
*तो म्हणाला, ‘‘नाही ! तिच्या बाबतीत जे घडलंय ते माझ्या बाबतीत घडलं असतं आणि माझ्या आजाराला कंटाळून तिनं दुसरं लग्न केलं असतं तर मला कसं वाटलं असतं?‘‘*
*डोंगराच्या पायथ्याला राहणारा, फाटकी विजार आणि तुटक्या वहाणा नेसलेला तो मला आता डोंगराएवढा मोठा भासत होता.*
*🙏💢🙏💢🙏💢🙏💢🙏*
Comments
Post a Comment