कनिष्ठभगिनीयोग

: कनिष्ठभगिनीयोग :

वधूपित्याने आणलेल्या दोघींपैकी "जी पसंत असेल ती पदरात घ्या," अशी खुली आफर दिलेली असते.पण थोरली दिसायला चांगली असूनही, आपण तिला पसंत केले तरी ती आपल्याला नकार देईल, या वायफळ भितीने तिच्याहून वर्णाने भलतीच गडद आणि अंगाने बऱ्याच आडव्या असलेल्या तिच्या धाकटया बहिणीला पसंत केले जाते. आणि पुढे "खरं तर ताईची तुमच्याशी लग्न करायची कित्ती कित्ती इच्छा होती," हे ती कनिष्ठ भगिनी स्वतःच्या मंगळसूत्राशी चाळा करीत सांगते. ह्याला 'कनिष्ठ-भगिनीयोग' म्हणतात. ही माणसे नोकरी मागायला जाताना शेठने "पगाराची अपेक्षा    काय ?" असे विचारल्यावर दोनशे स्टार्टची जाहिरात वाचूनही "दीडशे" म्हणतात. "आणि डेरनेस अलौन्स ? ते वायला पायजे काय ?"
  "छे छे !" म्हणत, कपाळावरचा घाम टिपतात.
  शेठजी खूष होतात आणि "पेला दाडा छे," म्हणून मसालानी चाय पाजतात. त्याला स्मरून कनिष्ठभगिनीयोगाची ही माणसे आयुष्यभर दीडशेवर रहातात. हे लोक स्वतःच्या घरातल्या दारावरची घंटी वाजवायला देखील भितात. आपल्याच घरात खाणावळीतले पैसे द्यायचे राह्यलेल्या मेंबरासारखे चोरून जेवतात. कनिष्ठ भगिनीयोगावर जन्मलेला माणूस एकदम 'पंचर'च होऊन जन्माला येतो. असल्या माणसाबद्दल लोक त्याच्या जिवंतपणीच 'हाडाचा गरीब', 'कुणाच्या अध्यात न मध्यात' वगैरे विशेषणे लावून तो कै. झाल्यासारखे बोलतात. असली माणसे मुलांच्या चड़यांच्या नाडया बांधतात. हळदीकुंकवाहून कलत्र "मेलं कुठं जाण नको न् कुठं येणं नको !" करीत आले, की सोडून ठेवलेल्या पैठणीची घडी करतात. रविवारी कोळिष्टके झाडतात. ह्या योगा वरच्या माणसाला खूप बोलावेसे वाटते पण सगळे बोलणे माणसे निघून  गेल्यावर सुचते. विनोद सुद्धा सुचतो. रात्री घरी सांगायचे ठरवतो, पण  "ती भाजी कशाला टाकलीत पानात ?" ह्या प्रश्नावर तो विनोद विसरून जातो. कनिष्ठभगिनीयोग हा शंभरात साठ टक्के कुंडल्यात सापडतो. समाजाचा गाडा ह्याच गुळगुळीत बाॅलबेअरिंग्जवर चालतो. ही माणसे न कुरकुरता दिवस ढकलीत असतात. साखळीला पाणी नसले तर आपण होऊन बादली ओततात; मालकाकडे तक्रार करीत नाहीत. बुटटी-अधिकारी-योगाचा ह्यांना
पडताळा येत नाही. कारण सुटटीच्या दिवशी घरी काय करायचे हाच जिथे प्रश्न तिथे बुटटी कसली ? ह्यांच्या घरी चोर आले, तर त्यांना ट्रंक उचलायला हेच मदत करतील ! वर "कपभर चहा तरी घेऊन जायचा. ही घरात नाही म्हणून-नाहीतर... या पुन्हा असेच ... बेतानं--डोकं आपटेल..." अशी बोळवण करतील. ह्या लोकांचा नम्रपणा परकोटीला गेलेला असतो. ह्या योगावर जन्लेला एक ग्रहस्थ रेडिमेड कपडयाच्या दुकानात नवा बुशशर्ट ट्राय करायला आरशासमोर उभा राहिला, आणि समोर कुणी ऐटबाज माणूस उभा आहे असे समजून स्वतःच्या प्रतिबिंबाला त्याने अदबीने नमस्कार केला. थोडक्यात  म्हणजे ही माणसे कुत्र्यालादेखील 'हाड' न करता स्वतःच फुटपाथ बदलतात.
  ह्यांच्या कुंडलीतले सगळेच ग्रह स्वगृहीच असतात. कुणाचीही कुणावर पापदृष्टी नसते. कुणी वक्रही नसतात, पण सरळही नसतात.त्यामुळे असल्या कुंडलीच्या माणसांची बहुधा मेषरास आणि मेषलग्न असते. ह्यांचा गुरू उच्चीला असला, तरी घरी शिकवणीला आलेल्या मास्तरासारखा वागतो. असल्या लोकांच्या खिशात नोटा कोंबल्या, तरी नाक पुसायला हातरूमाल काढताना त्या पडतात. ह्या वर्गातल्या मंडळींना बहुधा आकाश----
वाणीयोग असलेल्या बायका मिळतात. .......

           :  ह स व णू क  :

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .