गोष्ट आहे ही प्रत्येकच्या घरची ...... तिच्या त्याची आन् त्याच्या तिची .....
तिचा तो आणि त्याची ती
तिचा तो आणि त्याची ती .. दोघेही भिन्न स्वभावाचे .. जसे की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव .. पण तरीही एकमेकांशिवाय न राहणारे ..
दोघांच्या आवडी निवडी सुद्धा अगदी भिन्न ...
तिला वाचनाची खूप आवड तर हा पठ्या वर्तमानपत्राशिवाय काहीही न वाचणारा ... त्याला फिरायला फार आवडायचे... तर हि पक्की घरकोंबडी होती..
तसे बघितल तर संगीत हा समान दुआ होता दोघांच्यात...
पण तिला हळूवार संगीत आवडायचे तर याला धागडधिंगा ...
तिला पावसात चिंब भिजायला आवडे.. तर त्याच वेळी त्याला गोधडीत गुंडाळून बसवं वाटे ..
भाजी एकाच कोबीची पण तिला लाल तिखट घातलेली भाजी लागते ..तर त्याला मिरची घालून..
एका रम्य सायंकाळी तिला कॉफी चे घुटके घ्यायची हुक्की येई... तर त्याला वाफाळता चहा हवा असतो..
कधी फिरायला बाहेर गेलेच तर तिला हटकून पावभाजी खायची असते .... अन् त्याला उडप्या कडचा डोसा....
तिला जेव्हा रोमॅन्टिक मुव्ही बघायची असते नेमकी त्याच वेळी याची टीव्ही वर क्रिकेटची मॅच असते ..
तो ऑफीस मधून दमूनभागून येणार म्हणून तिने गरमागरम भजी करायचा घाट घातलेला असतो .... आणि त्याच वेळी स्वयंपाकघरात पिठाने भरलेल्या तिच्या हातात तो बटाटेवडयाचे पार्सल ठेवतो..
कधी तो हौसेने गजरा घेऊन येई .. त्याच दिवशी हि बया जीन्स आणि टॉप घालून बसलेली असायची ...
असा हा तिचा तो आणि त्याची ती
एकमेकापेक्षा कितीतरी वेगळे पण नेहमी एकमेकासाठीच जगणारे .....
त्याला लागता ठसका तिच्या डोळ्यात पाणी येई..
कापले तिचे बोट तर याचा जीव घाबरा होई ....
भांडलेच कधी दोघे तर चार दिवसांचा अबोला होई ....
पाचव्या दिवशी मात्र तो स्वतःच तिला कुशीत घेई ....
सुजलेले तिचे डोळे पाहून त्याला वाटे अपराधी ..व्याकूळ त्याचे मन पाहून येई तीच्या प्रेमाला भरती ......
लेकीच्या जन्मावेळी ती गेली होती त्रासून....... बाळंतपणाच्या कळा याने सोसल्या होत्या ऑपरेशनथेटर बाहेर बसून .......
लेकीचा मुखडा बघून दोघे गेले सुखावून ...प्रेमाच्या या बहरात दोघे निघाले न्हाऊन ....
दुडूदुडू धावणारया लेकी मागे गेले ते दमून ..... हट्टापुढे तिच्या दोघे गेले नमून ......
हळू हळू लेक त्यांची मोठी होऊ लागली .....आवडीनिवडीत तिच्या आता यांची आवड मागे पडू लागली ...
एके दिवशी लेक गेली तिच्या घरी भुर्रकन उडून ... त्या दिवशी दोघांनी अख्खी रात्र काढली एकमेकांच्या कुशीत रडून ....
चार दिवसाची कथा ही तिच्या आणि त्याच्या प्रीतीची ....
गोष्ट आहे ही प्रत्येकच्या घरची ......
तिच्या त्याची आन् त्याच्या तिची .....
Comments
Post a Comment