आखूडशिंगी बहुगुणी, आमची मुलगी लग्नाची आहे,

आजच्या दै ग्रामोद्धार मध्ये प्रसिद्ध "भोवताल" या सदरातील लेख

*आखूडशिंगी बहुगुणी*

"भाऊजी, आमची मुलगी लग्नाची आहे, एखादे चांगले स्थळ असेल तर पहा ना" आमच्या परिचितातल्या एका वहिनींनी मला सांगितले.

"मुलगी काय करतेय ? आणि काय अपेक्षा काय आहेत तुमच्या ?" मी आपले समाजकार्य करण्याचा हेतूने विचारले.

"मुलगी इंजिनीयर झालीय. पुण्यात जॉब करते आहे. आणि अपेक्षा म्हणाल तर तशा अजिबात फार नाहीत आमच्या.

पण मुलगा इंजिनिअर असेल तर एमटेक असावा. डॉक्टर असेल तर एमडी किंवा एमएस आणि कॉमर्स असेल तर सीए किंवा सीएस असावा. आणि आजची महागाई पाहता किमान आठदहा लाखाचे तरी पॅकेज पाहिजे.

शिवाय मुलगा पुण्यातला(च) पाहिजे, त्याचा स्वतःचा फ्लॅट असला(च) पाहिजे....." वहिनीच्या अपेक्षांची मारुतीची शेपटी संपता संपेना !

हे ऐकल्यावर, फार भूतकाळातील नव्हे तर फक्त बावीस वर्षांपूर्वीच्या माझ्या लग्नाच्यावेळची परिस्थिती मला आठवली. केवळ तीन हजार रुपये पगार मिळवायची लायकी असतानाही माझे लग्न झाले होते. आणि या अपेक्षांची जंत्री ऐकल्यावर माझीमलाच कीव वाटायला लागली.

तेवढ्यात माझे लक्ष माझ्या दोन मुलग्यांकडे गेले. लग्नाच्या बाजारात उद्या या दोन वस्तू विकण्यासाठी त्यांना आणि मला काय काय केले पाहिजे ह्या विचाराने पाय गळून गेले !

मुलाचे लग्न हा कधीनव्हे तो मोठ्ठा प्रश्न समाजात निर्माण झालेला आहे. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत मुलीचे लग्न हा पालकांचा रक्तदाब वाढवणारा विषय असायचा अन आज मुलाचे लग्न हा चिंतेचा विषय आहे.

त्याकाळात मुलीचा बाप अजीजी करायचा, आज तीच वेळ मुलाच्या बापावर आली आहे. त्याकाळात मुलाच्या पालकांनी माज केला, आता ती संधी मुलीच्या पालकांना मिळाली आहे.

हा लेख वाचल्यावर कदाचित मुलींचे पालक, विशेषत: लग्नाळू मुली अन त्यांच्या आया माझ्यावर टीकेची झोड उठवतील पण त्यांच्या अवास्तव अपेक्षांमुळे किती मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे हे दोन मुलांचा बाप म्हणून मला सांगायलाच पाहिजे.

मान्य आहे की आपली मुलगी सुस्थळी  पडावी अशी तिच्या आईबापांची ईच्छा असते. पण आजकाल या "सुस्थळी" या शब्दाचे अर्थ पूर्णपणे बदललेत. मुलाची आर्थिक परिस्थिती ही आता प्रमुख अट आहे.

आजकाल वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत मुले शिकत असतात. त्यानंतर नोकरी मिळावयास एक वर्ष जाते. पुढची तीन वर्षे तो कायम होण्यात घालवतो. अठ्ठाविसाव्या वर्षी लग्नाला उभा राहिलेला मुलगा लगेच लाखभर रुपये कसा काय मिळवू शकेलं हे कोडे मुलींना का पडत नाही ?

त्यांच्या वडिलांना सेवानिवृत्तीच्या वेळी असणारा पगार त्या लक्षात घेत नाहीत का ? बरं, असेल एखाद्या मुलाला तेवढा पगार, तर त्याच्या अपेक्षांचा विचार करावा लागेल की नाही ?

अशा मुलांच्या अपेक्षात आपण बसतो का याचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. शिवाय खाजगी क्षेत्रात जेंव्हा एक लाख पगार दिला जातो तेंव्हा त्या व्यक्तीकडून अगोदर दोन लाखाचे काम करवून घेतले जाते. असा माणूस घरासाठी कसा वेळ देऊ शकेल ?

मिळालेली संपत्ती उपभोगण्यासाठी जर वेळच नसेल तर ती मिळवून तरी काय फायदा ? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की कितीही पैसा मिळाला तरी पोटाचा आकार एक वीतभरच आहे, आणि भाकरीचा आकारही व्यक्तिप्रमाणे बदलत नाही.

एका ओळीत चालणा-या मुंग्यांकडे कधी पाहिलेत ? मातीचा एकेक कण गोळा करून वारूळ तयार करतात त्या ! चिमण्याचे दाम्पत्यसुद्धा एकेक काडी एकत्रपणे गोळा करत घरटे बांधते. मात्र आजकालच्या मुलींना मात्र  मोठा पगार, मोठा फ्लॅट, गाडी लग्नाआगोदरच मुलाकडे हवी असते.

जर या सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या तर त्यांनी संसारासाठी नेमके काय करायचे ? त्यात त्यासुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या असतात.

मग लग्न झाल्यावरही अपेक्षांची जंत्री संपत नाही. स्वयंपाक करणे, मुलांचे संगोपन, घरकाम यासाठी पैसे देऊन नोकरांची नेमणूक केली जाते. पाहुण्यांची सरबराई आणि वयोवृद्धांची सेवा या क्षुल्लक गोष्टी करायला वेळ कोणाकडे आहे ?

पैसा हे आणि एवढेच अंतिम ध्येय ! पण या पैशामुळेच संसार तुटू शकतात हे मात्र लोक लक्षात घेत नाहीत.

माझ्या नात्यात एका वडिलांना दोन मुली होत्या. थोरल्या मुलीला जरा गरीब घर मिळाले. काडीकाडी जमवत त्यांना संसार उभा करावा लागला.

दुसरीवर अशी वेळ यायला नको म्हणून त्यांनी श्रीमंत स्थळ शोधले. पैशाशिवाय बाकी काही चौकशी केली नाही. पण अती श्रीमंतीमुळे तो मुलगा बिघडलेला होता. त्याने कोणतेही सुख बायकोला दिले नाही. पण तुलनेने गरीब असलेल्या थोरल्या मुलीने व तिच्या पतीने स्वकामाईचे घर बांधले.

अर्थात प्रचंड अपेक्षा या मूलग्यांकडून सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर असतात. आज संसाराला डबलइंजिन हे लावावेच लागते, ती काळाची गरज आहे. पण त्यामुळे बायकोची कामेसुद्धा डबल झाली.

ऑफिसमधून दमून आलोय हे कारण सांगून पुरुषांना पाय पसरून टीव्ही पाहता येतो पण स्त्रियांना मात्र पदर खोचून कामाला लागावे लागते.

पैसे कमवायला जर स्त्री मदत करत असेल तर त्यांना घरकामात पुरुषांच्या मदतीची अपेक्षा असते. ती फारशी कधी पूर्ण होताना दिसत नाही. अती शिक्षण आणि भरपूर पैसा यामुळे संसाराचा पाया डळमळीत झालाय हे कटूसत्य नाकारून चालणार नाही.

घरात दोघांचाही येणारा पैसा हा दोघांचाही इगो वाढवतोय, पडती बाजू कोणी घ्यायलाच तयार होत नाही. शिक्षणामुळे ज्ञान वाढले आहे पण दोघांचीही प्रगल्भता नष्ट झाली आहे.

परिस्थितीनुरूप राहणीमान ठेवणे याला संसार म्हणतात हे दोघांनाही कळत नाही, आणि त्यांच्या मुलांनाही ! पैसे टाकले की सगळ्या गोष्टी विकत मिळतात हेच संस्कार त्यांच्या मुलांवर होतात.

"एक तीळ सात जणांनी वाटून खावा" यासारख्या म्हणींनी किती चांगले संस्कार घडवले होते मागच्या पिढीवर ! आता घरात एकच मूल असल्यामुळे त्याच्या एकट्यावरच सर्व सोयीसुविधांचा मारा होतो आहे.

आईवडील मुलांना वेळ देऊ शकत नाहीत मग वस्तूंच्या आणि सुविधांच्या रुपाने आईबाप ती कमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण दुधाची तहान ताकावर भागेल तरी कशी ?

खूप साध्यासुध्या आनंदाची अनुभूतीसुद्धा या मुलांना अनुभवायला मिळत नाही, मिळतो तो फक्त खर्च करायला पैसा ! आणि मग हीच जीवनपद्धती त्यांच्याही लग्नात आणि संसारात पुढे चालू राहते.

भारतीय संस्कृतीवर आधारलेली कुटुंबव्यवस्था आता पूर्णपणे ढासळू पाहत आहे. त्यामागे कारण एकच..... जोडीदाराबद्दलच्या अवास्तव अपेक्षा ! सर्व अपेक्षा पूर्ण होईपर्यंत ही तरुण पिढी लग्नच करत नाहीत, पण वय मात्र वाढत जाते.

वयाच्या पस्तिशीपर्यंत अविवाहित राहिल्यामुळे अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यात लिव्ह इन रिलेशनशिप हे परदेशातले संकट आपल्या समाजावर घोंगाऊ लागलेले आहे.

संस्कार आणि संस्कृतीचे कासरे तुटून गेलेत आणि संसाराचा वारू चोखूर उधळलेला आहे. तो थांबवणे आता फारसे सोपे राहिलेले नाही.

मुळात लग्न हाच केवळ नशिबाचा भाग आहे. तुमचा विश्वास असो-नसो पण चांगला जोडीदार अपेक्षेप्रमाणे मिळणे हे फार कमी मुलांच्या किंवा मुलींच्या नशिबात असते. जोडीदारापेक्षा आपल्या अपेक्षांना जास्त महत्व दिल्याने अनेक संसार तुटले आहेत.

पूर्वीच्या काळात एवढी प्रलोभने नव्हती. त्यामुळे अपेक्षाही माफक असायच्या. म्हणून संसार टिकले.
त्यामुळे आजच्या तरुण तरुणींना एकच सांगणे आज की जोडीदाराबद्दल  अवास्तव अपेक्षा ठेऊ नका, त्यात तुमच्याच आयुष्याचे नुकसान आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे, की गाय कशी हवी ? आखुडशिंगी, बहुगुणी, स्वभावाने गरीब, कमी खाणारी आणि जास्त दूध देणारी....अशीच पाहिजे ! मला तरी अशी गाय आजपर्यंत दिसली नाही, तुम्ही पाहिली का हो ?

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .