बोलणाऱ्या बायकांनो, तुम्ही बोलत रहा !
*!! बोलणाऱ्या बायकां !!*
बोलणाऱ्या बायका
किती खटकतात ना ...
प्रश्नांची तिखट उत्तरे देणाऱ्या
उलट टोकदार प्रश्न विचारणाऱ्या
किती टोचतात ना....
लज्जा बायकांचा दागिणा असतो
या आदर्श वाक्याला वाकुल्या दाखविणाऱ्या
सर्व तकलादू आदर्शांना
आपल्या स्कूटीच्या मागे बांधून ओढणाऱ्या
एकटक पाहणाऱ्या नजरांना नजर भिडविणाऱ्या
किती वाईट दिसतात ना बायकां
युगानुयुगे आम्हाला सवय आहे
झुकलेल्या मानेची
जिला स्मरणात रहावी पायातील प्रत्येक रेषा
जिची मान सदैव डोलेल सहमतीसाठी
जिच्या निर्णयांच्या हक्काची वेस
मर्यादित असावी फक्त स्वयंपाकघरापर्यंत...
आता त्यांची पूजा करण्यास नकार देऊन
जेंव्हा त्या शोधतात आपले अस्तित्व
तेंव्हा कुणास ठाऊक का आम्हाला
खटकत राहतो त्यांचा आत्मविश्वास
आम्ही शोधू लागलोय
त्यांना उध्वस्त करण्याचे प्रकार....
प्रत्येक यशस्वी स्री आमच्यासाठी
तडजोडीच्या बिछान्यातून येणाऱ्या
व्याभिचाराचे प्रतिक आहे.
प्रत्येक आधुनिक स्री चरित्रहीन
अन् प्रत्येक अभिनेत्री वेश्या.
जीन्स घालणे "चालू " असल्याचे चिन्ह आहे
अन् शॉर्ट्स घालणाऱ्या मुलींचे तर
रेट्ट्ससुध्दा आम्हाला ठाऊक असतात.
प्रतिप्रश्न विचारणाऱ्या बायकांना
गप्प बसविण्याचा
नसेल जालीम उपाय तर
खेचा त्यांना चारित्राच्या न्यायालयात
जेथे सर्व नियम, सर्व कायदे
पुरुषांचे, पुरुषांनी तयार केलेले.
ज्याच्या आड लपले जातील
ते तमाम अन्याय, अत्याचार
जे कायम पुरुषांचे हक्क राहिलेत.
बोलणाऱ्या बायकांनो,
आता बोलायला शिकू लागल्याच आहात तर
आता कधीच थांबू नका
गरज पडली तर ओरडाही
पण गप्प बसू नका
तुमचे गप्प बसणेच
तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे.
बोलणाऱ्या बायकांनो,
तुम्ही बोलत रहा !
~
Cp
Comments
Post a Comment