नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही

नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही
भांडण उकरुन काढायचं नाही
तो म्हणेल असं तर असं
तो म्हणेल तसं तर तसं
हो ला हो करायला काय जातय
आपलं मत मांडायचं नाही
नवऱ्याशी भांडायचं नाही
पण
आपला स्वभाव सोडायचा नाही.
भांडण उकरुन काढायचं नाही
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

मनात येईल ते  करत जाईल
घरभर पसारा मांडत जाईल
उगाच भांडत तंडत जाईल
आँफिसमधला राग सारा
आपल्यावरती काढत जाईल
आपण हसत ऐकून घ्यावे
चहाबरोबर पोहे द्यावे.
काहीच झाले नाही दाखवत
गरमागरम जेवण द्यावे.
सगळी आवराआवर करुन
पाठ फिरवून झोपी जावे.
उगीच दंगा करायचा नाही.
भांडण उकरुन काढायचं नाही .
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

त्याची आई देवते समान
त्याच्या बहीणी अप्सरे समान
त्याचे भाऊ कर्तबगार
पिताश्री तर जगात महान
आपण विरोध करायचा नाही
माहेरचं कौतुक करायचं नाही .
आपल्याभोवती त्याचं मन
घालत रहातं मग पिंगा
लगाम सैल सोडायचा नाही.
उकरुन भांडण काढायचं नाही.
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही .

पैसा पैसा जपून ठेवत
गंगाजळीत टाकत जायचा
महागाई वाढलीय किती
रोजच धोशा लावत जायचा
घरखर्चाला वाढीव पैसा
वेळो वेळी घेत जायचा
किती दमता घरासाठी
अभिप्राय देत जायचा
तोही खूष आपणही खूष
उगीच दंगा करायचा नाही .
उकरुन भांडण काढायचं नाही
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

मुलांचा अभ्यास घ्यायचा
घरासाठी वेळ द्यायचा
याची त्याची आवड जपत
रोज स्वयंपाक करत जायचा
हळुहळू करत करत
परक्या घरात रमत जायचं
होता होता त्याच्या घरास
आपलं घर करुन घ्यायचं
बघता बघता त्याच्या घरात
आपलीच सत्ता चालत जाते
एक परकी मुलगी येऊन
मालकीण बनून जाते
घरचा मालक बघताबघता
त्याच्याच घरचा पाहुणा होतो
आपण काही बोलायचंनाही.
भांडण उकरुन काढायचं नाही.
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

होता होता मुलंदेखिल
आपलीच बाजू घेत जातात
आपण काही बोलायचं नाही
मुलचं वाद घालत जातात.
साडी मिळेल, गाडी मिळेल.
मनासारखी माडी मिळेल
आपण कौतुक करत जायचं
उणंदुणं काढायचं नाही
भांडण उकरुन काढायचं नाही नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

आपला गल्ला वाढत जाईल
आपला सल्ला मानवत जाईल.
पावलो पावली संसारात
आपल्यावाचून अडत जाईल.
अडचणीच्या वेळेला
आपणच धावत जायचं
पैसा कमी पडला तर
गल्ल्यामधलं धनं द्यायचं
संकटात सापडल्यावर
मुळीच हिणवायचं नाही.
भांडण उकरुन काढायचं नाही .
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

पूर्वीचे दिवस आठवून
आगीमधे जळायचं नाही.
भांडण झालं विसरून जायचं
उगीच तळमळायचं नाही.
भलत्यासलत्या अन्यायाला
सहन ही करायचं नाही.
कुणाला छळायचं नाही.
छळून ही घ्यायचं नाही.
वेळ आली तर मग
दाखवून द्यायचा इंगा
घरासाठी जगतांना
शांतपणा सोडायचा नाही.
भांडण उकरुन  काढायचं नाही .
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

होता होता एक दिवस
नवराच आपला मित्र होतो
बापासारखा प्रेमळ होतो,
भावासारखा कोमल होतो
फुगून जरी दोडका होतो
तरी आपला लाडका होतो.
रोजच साखर पेरत जावी
कडू कारले गोड होते.
संतच सांगून गेले आहेत
ऊस डोंगा असला तरी
रस डोंगा असत नाही.
भांडण उकरुन काढायचं नाही.
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.

ओवाळणीला भाऊबीजेस
हजार दिले देऊ दे
बहिणीसाठी भारी साडी
घेतली तर घेऊ दे.
तू दोन हजार दे.
त्याहून भारी साडी दे.
तुझ्या कानात असलेली
मोत्याची कुडी दे.
नणंदेला आवडली तर
सोन्याची बांगडी दे.
त्याच्या पोटात खड्डा पडेल
खर्चाला आळा बसेल.
तू काहीच बोलू नकोस
आपोआप उजेड पडेल.
भावापेक्षा वहिनी चांगली
अशी कीर्तीही मिळेल.
अजून रहा महिनाभर
प्रेमळपणे नणदेस सांगा.
नवराच तेव्हा ,तिच्यासाठी
पोचवायला आणेल टांगा.
चांगुलपणा सोडायचा नाही.
भांडण उकरुन काढायचं नाही.
नवऱ्याशी पंगा घ्यायचा नाही.
घेतल्याशिवाय रहायचं नाही.
पण दिसू मात्रं द्यायचं नाही.

उर्मिला बांदिवडेकर. Shared from WhatsApp

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story